पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार! मग तुमच्या गरम सिंदूरचे, आता कोल्ड्रिंक झाले काय? उद्धव ठाकरे यांचा मोदींवर जोरदार हल्ला

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 जणांना धर्म विचारून मारण्यात आले. इथे आपले सैनिक शहीद झाले. त्यामुळे माता-भगिनींचे सिंदूर पुसले गेले, पण तरीही तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला परवानगी देणार आहात. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मेरे रग रग में खून नही गरम सिंदूर बहे रहा है… मग त्या गरम सिंदूरचे आता कोल्ड्रिंक झाले काय, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने दादरमध्ये आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. वृक्षारोपण व संवर्धन प्रेरणा मासाचा बक्षीस वितरण सोहळा छत्रपती शिवाजी मंदिर नाटय़गृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना भाजप नेत्यांना चांगला शिक्षक व गुरू न मिळाल्याने देशाचे नेतृत्व कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने चालले आहे याची उदाहरणे देत भाजप, मोदींपासून ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पाकिस्तानसोबत होणाऱया क्रिकेट सामन्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

निवडणूक प्रचारासाठी मोदी बिहारमध्ये गेले होते त्याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी बिहारमध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी भ्रष्टाचाऱयांचे आणि घुसखोरांचे रक्षण करण्यासाठी पुढे आले आहेत. मग मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की, तुम्ही महाराष्ट्रात याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला दंभमेळा असेल, कुंभमेळा वेगळा या दंभमेळय़ात सर्व ढोंगी आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. 70 हजार कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप तुम्हीच केलात. आदर्श घोटाळय़ाचा आरोप मोदींनीच केला आणि दुसऱया दिवशी अशोक चव्हाण तुमच्या बाजूला बसले, मग कोण कोणाचे रक्षण करतेय!

तेव्हा भूतदया कुठे जाते?

पक्षी आणि प्राण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, कबुतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तीणीसाठी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात. चांगली गोष्ट आहे. माणुसकी, भूतदया पाहिजे पण जेव्हा पहेलगाममध्ये आपले नागरिक मारले गेले, सैनिक शहीद झाले, आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले गेले त्याच्यासाठी माणुसकी आणि भूतदया कुठे? या घटनेला दोन-तीन महिनेही झालेले नाहीत. त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले आपले ‘ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नही हुवा वो शुरूही है…’ मग आपले पंतप्रधान म्हणाले की ‘खून और पानी एक साथ बहे नाही सकता’ ‘मेरे रग रग मे खून नही गरम सिंदूर बहे रहा है…’ मग त्या गरम सिंदूरचे काय कोल्ड्रिंक झाले? थम्स अप, कोका कोला झाले? आता चाय गरम गेला, थंडा थंडा लिंबू सरबत. लावायचा कुठे, कशाला या भाकडकथा करता तुम्ही? तिकडे शौर्य गाजवले सैनिकांनी आणि श्रेय घेतात, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

भाजपवाले गधडे

आपल्या सैन्यातील सोफिया कुरेशी या अभिमान वाटावा अशा महिला अधिकारी, पण या महिला अधिकाऱयालासुद्धा गधडे भाजपवाले आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली. आतासुद्धा ते मंत्री म्हणून बसले आहेत लाज वाटत नाही यांना. देशभक्तीचे थोतांड गात आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मग देशात कशाला शिष्टमंडळे पाठवली होती, असा सवाल करतानाच आपले शिष्टमंडळ जगभर गेले, पण एकही देश या लढय़ात आपल्या पाठीशी उभा राहिला नाही. मग मला सांगा कशाला पाठवली शिष्टमंडळे, असा सवालही त्यांनी केला.

मोदींना आश्वासनापुरती तरी हिंदी येते!

उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यावरील एक प्रसंगही यावेळी सांगितला. ते म्हणाले की, दिल्लीत मला एका हिंदी भाषिक पत्रकाराने, ‘हिंदी का विरोध क्यो कर रहे हो’ असा प्रश्न केला तेव्हा त्याला मी सांगितले की, आम्ही हिंदीला विरोध करीत नाही, पण सक्तीने हिंदी भाषा आमच्यावर लादू देणार नाही. मी काय बोललो ते तुला कळले ना? मला हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची नव्हती. तरीही दुसऱयाला समजावून सांगू शकतो तेवढी हिंदी मला समजते आणि माझ्याहीपेक्षा चांगली हिंदी आपले पंतप्रधान बोलतात. ते कोणत्या शाळेत शिकले? त्यांना पहिलीपासून हिंदी सक्ती होती का? पण त्यांना थापा नव्हे तर आश्वासन देण्यापुरती त्यांना हिंदी येते की नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. पाकिस्तानविरोधात कोणीही बोलायला तयार नाही. मग त्यांच्यासोबत आपण क्रिकेट का खेळत आहोत?

ऑलिम्पिकवरही बहिष्कार होता

अमेरिकेने ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. रशिया अफगाणिस्तामध्ये घुसली होती. म्हणून 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशाने बहिष्कार टाकला होता. 2022 मध्ये काही देशांनी चीनमधल्या विंटर ऑलिम्पिकवर राजनैतिक बहिष्कार टाकला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

जय शहापेक्षा देश मोठाच

अमित शहांचा मुलगा जय आयसीसीचा अध्यक्ष आहे म्हणून तो देशापेक्षा तुम्हाला मोठा वाटतो काय? देशापेक्षा क्रिकेट महत्त्वाचे आहे काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. कोण आहे हा जय शहा? तिकडे आपले सैनिक धारातीर्थी पडले किंवा तिकडे आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा जय शहा आणि क्रिकेट मोठे आहे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

शेख हसीना यांना कोणी आसरा दिला?

घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप आमच्यावर करता मग बांगलादेशच्या शेख हसीना यांना आसरा तुम्ही दिला. बांगलादेशींना विरोध करता आणि तिथून पळून आलेल्यांना आसरा तुम्ही देता आणि आम्ही घुसखोरांचे रक्षण करतो म्हणून आम्हालाच सांगता?