बांगलादेश पोलीस अधिकारी निघाला घुसखोर, बीएसएफने ताब्यात घेऊन केले बंगाल पोलिसांच्या स्वाधीन

हिंदुस्थान – बांगलादेश सीमेवर मेघालयातील दक्षिण-पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यातील रंगडंगाई गावात शनिवारी हिंदुस्थानी सीमा सुरक्षा दल (BSF) आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. यामध्ये एक माजी बांगलादेशी पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. या व्यक्तींवर लूटमारीचा प्रयत्न आणि अपहरणाचा संशय आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जामालपूर येथील जहांगीर आलम, माजी पोलीस कॉन्स्टेबल मारफुर रहमान, नारायणगंज येथील सायेम हुसैन आणि कुमिल्ला येथील मेहफुझ रहमान यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुनामगंज सीमेपासून सुमारे आठ किलोमीटर आत हिंदुस्थानात घुसले होते. त्यांच्याकडून बांगलादेशी पोलिसांचे ओळखपत्र, पिस्तूल, मॅगझिन कव्हर, रेडिओ सेट, मोबाईल फोन, मास्क, कुऱ्हाड, तार कापण्याचे साधन, बांगलादेशी चलन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.