
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेकडून अद्ययावत मोबाईल अॅप सुरू करणार आहे. यामध्ये मतदार राजाला आपल्या प्रभागासह मतदान केंद्राची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे ऐन मतदानादिवशी होणारी पळापळ थांबणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेने शुक्रवारी रात्री उशिरा प्रभाग रचना आपल्या अॅपवर जाहीर केली. मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये मतदानाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था, आरोग्य पथक, पाणी आणि स्वच्छता आदी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.
मतदान केंद्रात मोबाईलबंदी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मतदार केंद्रापासून 100 मीटर अंतराबाहेर मोबाईल ठेवावा लागणार आहे.
असे पुरावे लागणार
पालिका निवडणुकीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी मतदानाला जाताना असे पुरावे स्वतःजवळ ठेवावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.