गुजरातवर ५,४०० कोटींची खैरात, अनेक प्रकल्पांचे लोकार्पण; पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ आणि २६ ऑगस्ट असे दोन दिवस गुजरात दौर्‍यावर असणार आहेत. अहमदाबादमध्ये ते ५ हजार ४०० कोटींहून अधिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर ते सोमवारी सायंकाळी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. अहमदाबाद येथील हंसलपूर मध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थआनिक उत्पादन प्रकल्पाचे ते सकाळी उद्घाटन करणार असून १०० देशांना बॅटरी इलेक्ट्रिक वाहने निर्यात करण्याच्या योजनेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

१ हजार ४०० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद असलेल्या अनेक रेल्वे प्रकल्पांचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी सायंकाळी अहमदाबादच्या खोडलधाम मैदानात ते कोट्यवधी रुपयांची तरतूद असलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत.

जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणार

सरकार तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा देत देशातील व्यापार्‍यांना आत्मनिर्भर बनण्याचा संदेशही दिला. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. सरकारने स्किल इंडिया मिशन सुरू केले आहे. या मोहीमेअंतर्गत कोट्यवधी तरुणांना प्रशिक्षण देऊन विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळ म्हणून तयार करण्यात येत आहे. आज जगातील सर्वात मोठा भाग वाढत्या वयाशी लढत आहे. आता त्यांना तरुणांची गरज आहे आणि िंहदुस्थान ही गरज पूर्ण करतो, असेही ते म्हणाले.