
हैदराबादमधून माणूसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 27 वर्षीय पुरूषाने आपल्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मुसी नदीत फेकून दिले. ही घटना गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेडिपल्ली पोलीस स्टेशन परिसरातील बोडुप्पल परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा एक कॅब ड्रायव्हर आहे. आरोपी आणि मृत महिला हे विकाराबाद जिल्ह्यातील रहिवासी होते. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघेही हैदराबादच्या बोडुप्पल येथे भाड्याच्या घरात राहू लागले . सुरुवातीच्या काळात सर्व काही सुरळीत सुरू होते, परंतु काही काळानंतर त्याच्यात वाद वाढू लागले.
एप्रिल 2024 मध्ये पत्नीने विकाराबाद पोलिसांकडे घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. पण नंतर गावातील वृद्धांच्या उपस्थितीत ते प्रकऱण मिटवण्यात आले. यानंतर मृत महिलेने पंजगुट्टा येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली होती, परंतु पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय असल्यामुळे, त्याने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. यानंतर मार्च 2025 मध्ये महिला गर्भवती राहिली. मात्र नवरा बायकोमधील वाद काही थांबत नव्हते.
22 ऑगस्ट रोजी, महिलेने नवऱ्याला सांगितले की ती वैद्यकीय तपासणीसाठी विकाराबादला जाणार असून नंतर तिच्या आई वडिलांच्या घरी जाणार आहे. तेव्हा पुन्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
दरम्यान भांडण सुरू असताना महिलेने आरोपीशी गैरवर्तन केले. याच्याच रागातून आरोपीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी संध्याकाळी त्याने आपल्या पत्नीला गळा दाबून मारून टाकले. त्यानंतर त्याने एक्सो ब्लेडने मृतदेह कापला. त्याने तिचे डोके, हात आणि पाय कापले आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले आणि प्रतापसिंगराम परिसरातील मुसी नदीत फेकून दिले. आरोपीने तीन वेळा नदीत जाऊन शरीराचे वेगवेगळे भाग तिथे फेकले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीने बायकोचे सगळे अवयव नदीत फेकले पण धड मात्र तिच खोलीत लपवले. गुन्हा केल्यानंतर आरोपीने आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की त्याची पत्नी बेपत्ता झाली आहे. बहिणीला संशय आला आणि तिने एका नातेवाईकाला याबाबत माहिती दिली. नातेवाईक आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. तेथे आरोपीने प्रथम बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी रचण्याचा प्रयत्न केला, परंतु कडक चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घरातून मृतदेहाचे धड जप्त केले आहे आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. एनडीआरएफचे कर्मचारी आणि जीएचएमसी जलतरणपटू मुसी नदीत फेकलेले मृतदेह शोधण्यासाठी सतत शोध मोहीम राबवत आहेत, परंतु हात, पाय आणि डोके अद्याप सापडलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मृतदेहाचे उर्वरित भाग आणि हत्येत वापरलेले शस्त्र जप्त करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.