
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी हुकूमशहा नाही तर खूप बुद्धिमान व्यक्ती आहे. ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला की, मी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होण्यापासून रोखले होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील युद्ध पुढील पातळीवर पोहोचले होते. हे युद्ध अणुयुद्धाचे रूप घेऊ शकले असते. या दरम्यान सात जेट विमाने पाडण्यात आली आणि ते थांबवण्यासाठी त्यांच्याकडे फक्त काही तास होते. मी हे युद्ध थांबवले.”
ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही भाष्य केले. ट्रम्प म्हणाले, “अमेरिका आता युक्रेनवर पैसे खर्च करत नाही. आम्ही युक्रेनशी नाही तर नाटोशी व्यवहार करतो. आम्हाला युद्ध संपवायचे आहे आणि या संदर्भात व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा केली आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवणे माझ्यासाठी सर्वात सोपे काम होते, परंतु ते आता गुंतागुंतीचे होत चालले आहे.”