घरं वाहून गेली, गाड्या चिखल्यात रुतल्या; 4 जणांचा मृत्यू, जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये ढगफुटीनंतर हाहाकार

जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. थाथरी उपमंडळामध्ये अति मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला असून यात 15 घरं वाहून गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘आज तक‘ने दिले आहे.

डोंगरावरून अचानक वाहून आलेल्या दगड, धोंडे, चिखलामुळे मोठी वित्तहानी झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिनाब नदीनेही धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागामध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

डोडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागामध्ये ढगफुटी झाल्याने चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी वाढली असून काही घरं वाहून गेली आहेत. याबाबत जम्मू-कश्मीरचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असून चिनाब नदीला महापूर आला आहे. दोन ठिकाणी ढगफुटी झाल्याचे वृत्त असून यात एनएच 244 महामार्ग वाहून गेला आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन गांधोर, तर एक थाथरी उपमंडळातील आहे. 15 घरांचेही नुकसान झाले असून गोठेही वाहून गेले आहेत. तसेच एका खासगी आरोग्य केंद्राचेही यात नुकसान झाले आहे. चिनाब नदीजवळची वाहतूक मर्यादित ठेवण्यात आली असून नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती हरविंदर सिंग यांनी दिली.