
देवरूख-साखरपा रस्त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन संशयित हालचाली करताना सापडला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल २१ लाख ४० हजार १६० रूपये किंमतीचा गुटखा सापडला. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्यानंतर अन्न व औषध प्रशासन नक्की काय करतेय हा सवाल नागरिक विचारत आहेत.
विकास गंगाराम पडळकर वय २८ आणि तेजस विश्राम कांबळे वय २३ दोघेही रा. सांगली यांची झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्या अशोक लेलॅंड पिकअप गाडीच्या हौद्यात गोण्यामध्ये आणि पुठ्यांच्या खोक्यात प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा सापडला. २१ लाख ४० हजार १६० रूपये किंमतीचा हा पानमसाला आणि गुटखा तसेच ७ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली.
अन्न व औषध प्रशासन सुस्त
गुटख्याच्या गोणीच पकडून पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा विक्रीचा पर्दाफाश केला आहे. पकडलेला गुटखा संगमेश्वर तालुक्यात वितरित होणार होता.या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या सक्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.आतापर्यंत अन्न व औषध प्रशासनाने किती गुटखा पकडला? गुटखा विक्रीवर त्यांचा काही अंकुश आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.