
हिंदुस्थानचा ऑलिम्पियन खेळाडू अनिश भानवाला याने १६व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे हिंदुस्थानने पदकतक्त्यात आपली आघाडी अधिक मजबूत केली आहे. सध्या हिंदुस्थानच्या खात्यात ३९ सुवर्ण, १८ रौप्य, १७ कांस्य अशी एकूण ७४ पदके जमा आहेत.
२२ वर्षीय अनिशने अंतिम फेरीत ३५ गुण मिळविले. मात्र, चीनच्या सू लियानबोफानने ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. याआधी, अनिशने आदर्शसिंह आणि नीरजकुमार यांच्यासह संघ स्पर्धेत १७३८ गुणांसह रौप्यपदक जिंकले होते. आदर्शने पात्रता फेरीत ५८५ गुणांसह दुसरे स्थान मिळवीत अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम फेरीत तो पाचव्या क्रमांकावर राहिला. नीरजने पात्रता फेरीत ५७० गुणांची कमाई केली.
अंतिम फेरीत अनिश हा चौथ्या सीरिजपर्यंत आघाडीवर होता. मात्र, पाचव्या सीरिजमध्ये एक शॉट चुकल्याने सू याने परफेक्ट पाच मारून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये एक गुणांचा फरक राहिला. अखेरच्या सीरिजमध्ये अनिशने परफेक्ट पाच मारून दडपण टाकले; परंतु सू यानेही परफेक्ट पाच गुणांचा वेध घेत सुवर्णपदक निश्चित केले.
ट्रॅप मिक्स्ड टीममध्ये चौथा क्रमांक
चॅम्पियनशिपमधील अंतिम ऑलिम्पिक इव्हेंट ट्रॅप मिक्स्ड टीममध्ये भारताच्या किनन डेरियस चेनाई आणि आशिमा अहलावत या जोडीला कझाकिस्तानच्या अलीशेर अल्सालबायेव आणि आयझान डॉ स्मागांबेतोवा यांच्याकडून ३४-३८ असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे भारतीय जोडीला कांस्यपदक गमवावे लागले. या जोडीने कोरियाविरुद्ध ‘शूट ऑफ’ जिंकून पदक फेरी गाठली होती. दुसरी भारतीय जोडी लक्ष्य श्योरन आणि वैयक्तिक विजेती निरू धांडा १३२ गुणांसह नवव्या क्रमांकावर राहिली.
ज्युनियर ट्रॅप मिक्स्ड टीममध्ये रौप्य
ज्युनियर गटातील ट्रॅप मिक्स्ड टीम स्पर्धेत आर्यवंश त्यागी आणि भाव्या त्रिपाठी या हिंदुस्थानी जोडीला कझाकिस्तानच्या निकिता मोईस्सेयेव आणि एलेओनोरा इब्रागिमोवा या जोडीकडून ३७-३८ अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नॉन-ऑलिम्पिक प्रकारातही हिंदुस्थानचे यश
ऑलिम्पिक प्रकार संपल्यानंतर सुरू झालेल्या नॉन-ऑलिम्पिक प्रकारातही हिंदुस्थानने पहिल्याच दिवशी दोन पदके जिंकली. पुरुष ज्युनियर ५० मीटर पिस्टल टीम स्पर्धेत सुवर्ण आणि सीनियर गटात रौप्य, पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात योगेश कुमार (५४८-६ एक्स), राम बाबू (५४५-६ एक्स), अमनप्रीत सिंग ५४३-६ एक्स), रवींदर सिंग (५४२-९ एक्स), विक्रम जे. शिंदे (५३९-७ एक्स) यांनी हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले. पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल ज्युनियर गटात अभिनव चौधरी (५४१-९ एक्स), हरिओम चावडा (५३४-५ एक्स), उमेश चौधरी (५२९-५ एक्स) व मुकेश नेलावली (५२३-११ एक्स) यांनी हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले.