आत्ताच जागे व्हा! रघुराम राजन यांचा इशारा

‘अमेरिकेने हिंदुस्थानी आयातीवर लादलेला 50 टक्के टॅरिफ हे दोन्ही देशांचे संबंध पुरते बिघडल्याचे द्योतक आहे. हिंदुस्थानसाठी ही चिंतेची बाब असून सरकारने आत्ताच जागे व्हायला हवे,’ असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज दिला.

रघुराम राजन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ‘व्यापारासाठी एकाच देशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे योग्य नाही. अमेरिकेशी व्यापार सुरूच ठेवताना हिंदुस्थानने आता पूर्वेकडे, युरोपाकडे, आफ्रिकेकडेही बघायला हवे. इतकेच नव्हे, 8 ते 8.5 टक्के आर्थिक विकास साधण्यासाठी काही आर्थिक सुधारणाही घडवून आणायला हव्यात जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल, असा सल्ला राजन यांनी दिला.

रशियन तेल खरेदीचा पुनर्विचार करावा

टॅरिफमुळे बाहेरील वस्तू अमेरिकेत महाग होणार आहेत हे ट्रम्प यांना माहीत आहे, मात्र टॅरिफच्या माध्यमातून मिळालेल्या वाढीव महसुलाचा फायदा कर सवलतीच्या रूपात अमेरिकी नागरिकांना द्यायचा असा त्यांचा प्रयत्न असेल, असेही राजन म्हणाले. हिंदुस्थानवर जास्त टॅरिफ लादण्यामागे केवळ रशियाकडून तेल खरेदी हा मुद्दा नाही. हा एका व्यापक रणनीतीचा भाग आहे, पॉवर प्ले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणाचा हिंदुस्थानने पुनर्विचार करावा, असे राजन म्हणाले.

टॅरिफ हा लष्करी ताकदीला पर्याय

‘जिथे लष्कराचा वापर करता येत किंवा तशी इच्छा नाही, तिथे टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर करायचा ही अमेरिकेची रणनीती दिसते आहे. जगातील सर्व देश अमेरिकेचा फायदा उचलत असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. हे त्यांचे मत आजचे नाही, असे राजन म्हणाले.