आजपासून आशियाई हॉकी करंडकासाठी संघर्ष, पाकिस्तान सुरक्षा कारणास्तव आशिया करंडकातून बाहेर 

आजपासून आशियाई हॉकी स्टिकचे युद्ध सुरू होणार आहे. या स्पर्धेत आठ संघ आपला खेळ दाखवतील. पुरुष आशिया करंडक हॉकी स्पर्धेमधून पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतल्यामुळे स्पर्धेचा थरार काहीसा कमी झाला आहे. तसेच ओमाननेही वैयक्तिक कारणास्तव सहभाग नाकारला असल्याची माहिती हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिली.

बिहारच्या राजगीर येथे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान होणाऱया या स्पर्धेत महत्त्वाचा बदल घडला आहे. पाकिस्तान व ओमान यांच्या जागी आता बांगलादेश आणि कझाकिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत. आशियाई हॉकीत परंपरेने मोठे नाव असलेला पाकिस्तान बाहेर पडल्याने बांगलादेशला थेट संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे ओमानऐवजी कझाकिस्तान स्पर्धेत उतरला आहे.

अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले, पुरुष आशिया करंडक 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान बिहारच्या नव्याने बांधलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेला बिहार सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. पाकिस्तानने सुरक्षा कारणास्तव, तर ओमानने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.

आठ संघांची चुरस

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आता आठ देश सहभागी होतील. यजमान हिंदुस्थानसह जपान, चीन, कझाकिस्तान, मलेशिया, कोरिया, बांगलादेश आणि चिनी तैपेई. ही स्पर्धा एफआयएच हॉकी विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा ठरणार असल्याने प्रत्येक सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

हिंदुस्थानचा प्रवास

यजमान हिंदुस्थानला ‘अ’ गटामध्ये जपान, चीन आणि कझाकिस्तानसोबत स्थान मिळाले आहे. हिंदुस्थानचा मोहिमेचा प्रारंभ 29 ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध होईल. त्यानंतर 31 ऑगस्टला जपानशी, तर 1 सप्टेंबरला कझाकिस्तानशी अखेरचा साखळी सामना खेळला जाईल.