
गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचे कहर केला असतानाच आता नांदेड शहरात पहाटे साडेचार ते सहा वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच विष्णुपुरी धरणाचे 8 दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, कंधार, लोहा या तालुक्यांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशातच शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता नांदेड शहरात या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले. सिडको परिसरातील घराघरात पावसाचे पाणी घुसले असून संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शहरातील सिडको, हडको, वसरणी, लालवाडी, श्रीनगर, सरपंच नगर, वजिराबाद, महावीर चौक, सांगवी, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, फुले नगर, आनंदनगर भागातील ही घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. याशिवाय देगलूर नाका परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडाली आहे. तसेच नांदे-नरसी मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने या भागावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
विष्णुपुरी धरणाचे 8 दरवाजे उघडले
विष्णुपुरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता धरणाच्या आठ दरवाजातून गोदावरी नदी पात्रात 88 हजार 143 पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सदर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड शहरात पहाटे साडेचार ते सहा वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. #rain #rainupdate pic.twitter.com/CzrUECWKPi
— Saamana Online (@SaamanaOnline) August 29, 2025
लष्कराला केले पाचारण
नांदेड शहरातील पूर परिस्थिती लक्षात घेता संभाव्य मदतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लष्कराला पाचारण केले आहे. नांदेड शहरातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कर संयुक्तरीत्या मदत करतील अशी माहितीही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
सतर्क राहण्याच्या सूचना
नांदेड जिल्हा आणि शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांनी सतर्क राहावे. सखल भागात पाणी शिरत असल्याने या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी त्वरित स्थलांतरित व्हावे. गरज पडल्यास महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे तातडीने संपर्क करावा. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी नागरिकांनी ही काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.