
हिंदुस्थानची दिग्गज बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 मधून बाहेर पडली, मात्र सिंधूच्या प्रयत्नांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शुक्रवारी झालेल्या महिलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूला इंडोनेशियाच्या पुत्री वर्दानीकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू स्पर्धेबाहेर झाली आणि सहावे पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले. अखेरच्या काही मिनिटांत सिंधू डगमगली आणि 64 मिनिटांच्या रोमांचक सामन्यात तिला 14-21, 21-13, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.
सिंधू 2019 ची वर्ल्ड चॅम्पियन आहे. पाच वेळा पदक विजेती सिंधू या स्पर्धेत सहाव्या पदकाच्या दिशेने वाटचाल करत होती. परंतु तिला उपांत्यपूर्व फेरीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. सिंधू हरली असली तरी तिच्या प्रयत्नांनी प्रेक्षकांना मात्र आपलेसे केले. तिची प्रतिस्पर्धी वर्दानी हिला सामना जिंकल्यानंतर अक्षरशः रडू कोसळले. यावरून सिंधूने स्पर्धेत कशी लढत दिली हे स्पष्ट होते.