
सोन्या-चांदीची किंमत रॉकेट वेगाने पुढे झेपावत आहेत. 1 सप्टेंबर रोजी सोने-चांदीने आतापर्यंतचा विक्रमी भाव गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, सोमवारी सोने दरात 2404 रुपयांची वाढ होऊन 104792 रुपये प्रति तोळा पोचले. याआधी सोने 102388 रुपये एवढे होते. चांदीची किंमत 5678 रुपयांनी वाढून 123 250 रुपये प्रति किलो पोचली. याआधी चांदी 117572 रुपये एवढी होती.
कमकुवत झालेला अमेरिकन डॉलर, सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीची आशा, अमेरिकन टॅरिफशी जोडलेली अनिश्चितता ही दरवाढीची कारणे आहेत. अमेरिकेच्या टॅरिफमुळे भू-राजकीय तणाव निर्माण होऊन सोन्याला पाठबळ मिळत आहे. सोन्याची मागणी सतत वाढत आहे. अशातच सोने एक लाख आठ हजार रुपये प्रति तोळा एवढे जाऊ शकते. तर चांदी या वर्षी 1 लाख 30 हजार रुपये एवढी जाऊ शकते. या वर्षी म्हणजे 1 जानेवारीपासून आतापर्यंत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 76,162 रुपयांवरून 1,04,792 रुपये पोचला आहे. तर चांदीचा भाव 86,017 रुपये प्रति किलोवरून 1,23,250 रुपये झाला आहे. मागच्या वर्षी 2024 मध्ये सोने 12,810 रुपये महाग झाले होते. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,05,880 रुपये तर 22 कॅरेटची किंमत 97,050 रुपये आहे. दिल्लीत 24 पॅरेटची सोन्याची किंमत 1,06,030 रुपये तर 22 कॅरेटची किंमत 97,200 रुपये आहे.
दरवाढीची नेमकी कारणे काय
सराफा व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचा टॅरिफ प्लान आणि व्यापार युद्धाच्या भीतीने गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक समजून त्याची खरेदी करत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे, हेदेखील सोने महाग होण्याचे कारण मानले जातंय. याशिवाय चीन आणि रशियादेखील मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढत आहे. रशिया- युक्रेन युद्धाचे सावटही सोन्यावर आहे.