
महामार्गावर टोलसाठी असलेल्या फास्टॅगमुळे वाहन चोरून पळालेल्या क्लिनरला तुरुंगवारी झाली आहे. नंदलाल राजपूत असे त्याचे नाव आहे. पोलीस पकडतील म्हणून तो गावी न जाता हैदराबाद येथे गेला. अखेर पोलिसांनी फास्टॅगच्या माध्यमातून नंदलालच्या मुसक्या आवळल्या.
नंदलाल राजपूत हा मालाड पूर्व येथे एका एजन्सीच्या डिलिव्हरी वाहनावर क्लिनर म्हणून काम करत होता. क्लिनर म्हणून काम करताना तो वाहन चालवण्यास शिकला. वाहन चालक नसताना तो डिलिव्हरी देण्यासाठी वाहन घेऊन जात असायचा. गेल्या आठवड्यात त्याला मालकाने मालाड आणि दहिसर येथे वस्तू पोहचवण्यासाठी दिल्या. त्या वाहनात दोन लाख रुपयांचे साहित्य होते. तसेच त्याने काही ग्राहकांकडून 53 हजार रुपये देखील घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. काही ग्राहकांना वस्तू पोहचल्या नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तसेच रात्री 9 वाजता नंदलालने वाहन देखील पार्क केले नव्हते. तो वाहन घेऊन निघून गेला. या प्रकरणी नंदलालला अटक केली आहे.