
ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कर्जतच्या कोल्हारे गावात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ऐन गणेशोत्सवात रहिवाशांना प्रचंड त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन युवासैनिकाने स्वखर्चाने खड्डे बुजवून गावकऱ्यांना मोठा दिल ासा दिला आहे. युवासेनेने मदतीचा हात दिल्याने रस्त्यावरून जाणे सोयीचे झाले असून या सामाजिक कार्याचे स्वागत करण्यात आले आहे.
कोल्हारे गावातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले होते. पाणी साचल्यामुळे नागरिकांना पायी चालणे जिकिरीचे झाले होते. मात्र ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी याकडे डोळेझाक केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष होता. याचवेळी युवासेनेचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते संदेश हजारे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले. यापुढेही आपण ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकर घेऊ, असे आश्वासन संदेश हजारे यांनी दिले आहे.
प्रशासनाविरोधात संताप
हजारे यांनी यापूर्वीदेखील नेरळ-पेशवाई मार्गावरील खड्डे स्वखर्चातून बुजवले होते. तसेच कोल्हारे गावातील नैसर्गिक नाल्याची स्वच्छता ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केली होती. कोल्हारे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक समस्या रहिवाशांना भेडसावत आहेत. पण त्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या पाठिशी युवासेना ठाम उभी राहील, असे हजारे यांनी सांगितले.