फडणवीस म्हणतात, हा सरसकट नव्हे, पुराव्यांचा जीआर, भुजबळांना समजावलं

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने काढलेल्या शासन निर्णयाबद्दल (जीआर) समाजात मतमतांतरे आहेत. या जीआरमुळे मराठय़ांचा ओबीसीत समावेश होतो आणि त्यांना ओबीसींच्या कोटय़ातून आरक्षण मिळते असा ओबीसी समाजाचा समज झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज स्पष्टीकरण दिले. मराठा आरक्षणाबाबत काढलेला जीआर म्हणजे सरसकट आरक्षण नव्हे तर केवळ पुराव्यांचा जीआर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करत शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच मराठय़ांना नोंदींची तपासणी करून कुणबी दाखले देण्यात येतील असेही सांगितले. त्यासंदर्भातील जीआरमंगळवारी काढले गेले.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही

या जीआरद्वारे मराठय़ांना सरसकट आरक्षण देण्यात येत असल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, तो जीआर मराठा समाजाला आरक्षणाचा सरकटचा लाभ देणारा नाही, खरे कुणबी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताच धक्का लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

विखे-पाटलांनी घेतली जरांगेंची भेट

मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत उलटसुलट वक्तव्य केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी आज संभाजीनगर येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली. कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्याचा शब्द विखे-पाटील यांनी यावेळी जरांगेंना दिला.

भुजबळ चर्चेला का आले नाही?

जीआर काढल्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत, याबद्दल विचारले असता, विखे पाटील म्हणाले की, भुजबळ यांच्याशी आज सकाळीच बोललो आहे. भुजबळ यांना सरकारी चर्चेत यायला काय अडचण होती? चर्चेत तुम्ही तुमची मते मांडली असती, तर ऐकले असते, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

  • ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या कारणास्तव मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालत आपली नाराजी दर्शवली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत बोलताना, भुजबळ यांना आपण समजावले असल्याचे सांगितले. भुजबळ हे कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत, त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे, असा दावा त्यांनी केला. भुजबळांच्या मनात शंका असेल तर ती दूर करू असे ते म्हणाले.

…म्हणून हैदराबाद गॅझेट्समधील पुरावे ग्राह्य

हैदराबाद गॅझेटबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठवाडय़ात इंग्रजांचे राज्य नव्हते. तिथे निजामाचे राज्य होते. त्यामुळे मराठवाडय़ातील कुणबी नोंदींचे पुरावे फक्त निजामाच्या म्हणजे हैदराबाद गॅझेट्समध्ये मिळतात. म्हणून त्या गॅझेट्समधील पुरावे सरकारने ग्राह्य धरले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.