मोदींच्या स्वदेशीच्या नाऱ्याला केराची टोपली…, ‘टेस्ला’च्या खरेदीवरून काँग्रेसचे टीकास्त्र

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्ला कार विकत घेतली. टेस्लाच्या खरेदीवरून महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

अमेरिकेची गाडी तीही पूर्णपणे आयात केलेली खरेदी करणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या आदेशाचे हे खुलेआम उल्लंघन नाही का? तेही भाजपप्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून? असे प्रश्न उपस्थित करून भाजपने यावर विशेष टिप्पणी करावी, अशी मागणी  काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी आज केली.

पैसा कोणता वापरलाकाळा की गोरा?

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने नोटीस बजावली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही सरनाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा नारा देताना म्हणाले आहेत की, पैसा काळा असो की गोरा असला तरी चालेल. त्यामुळे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकेच्या कंपनीने बनवलेली टेस्ला ही कार घेतली. त्यासाठी दिलेला पैसा काळा होता का गोरा, हा प्रश्न आता काला धन नावाने बोंब ठोकणाऱ्या नरेंद्र मोदींनीच संपवला आहे. त्यामुळे ही अमेरिकेची कार घेताना कोणता पैसा वापरला याचे उत्तर गुलदस्त्यात राहील अशा शब्दांत सचिन सावंत यांनी समाचार घेतला.