सिमेंट कंपन्यांची चालबाजी उघड, जीएसटीचे दर बदलण्याआधीच किमती वाढवून ठेवल्या

मोदी सरकारने सिमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांहून 18 टक्क्यांपर्यंत कमी केली. त्यामुळे सिमेंटची किंमत 40 ते 50 रुपयांनी कमी व्हायला हवी होती. परंतु जीएसटी घटवण्याच्या 5 दिवसांपूर्वीच सिमेंट कंपन्यांनी  किमती 50 रुपयांनी वाढवल्या. आता कंपन्या सिमेंटचे दर कमी करत असल्याचे सांगणार. मात्र यात कंपन्यांचे कुठल्याच प्रकारचे नुकसान होणार नसून जनतेला मात्र घरे महागडय़ा दरातच खरेदी करावी लागणार आहेत. कंपन्यांच्या या चलाखीवर सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सिमेंट आणि घरे उभारण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांवरील जीएसटीत कपात करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचे रियल इस्टेट उद्योगाकडून जोरदार स्वागत होत आहे. हिंदुस्थानात घर उभारण्यासाठी 12 ते 15 टक्के सिमेंट लागते. त्यामुळे सिमेंटवरील जीएसटी कमी करून जनतेला मोठा दिलासा देण्यात आल्याचे चित्र उभे राहिले. मात्र प्रत्यक्षात सिमेंटचे दर जैसे थेच राहणार आहेत. कंपन्या आपण सिमेंटच्या दरात कपात करत असल्याचे भासवणार आहेत.

गेल्या दोन वर्षांत सिमेंट 80 रुपयांनी महागले

गेल्या दोन वर्षांत सिमेंटच्या दरात तब्बल 80 रुपयांनी वाढ झाली आहे. आता जीएसटीचे दर घटवल्यामुळे प्रतिबॅग सिमेंटच्या दरात 40 ते 50 रुपयांची घट होईल असे सांगितले जात आहे. सध्या एसीसी सिमेंट 425 ते 435 रुपये प्रतिबॅग तर गोल्ड 475 ते 485 रुपये प्रतिबॅग अशी किंमत आहे. नव्या दरांनुसार किमतीत सरासरी 10 टक्क्यांची घट होईल. एसेसीचे सर्वसाधारण सिमेंट 382 ते 392 रुपये आणि गोल्ड 427 ते 437 रुपयांनी विकले जाऊ शकते. अशाच प्रकारे अल्ट्राटेकचे सिमेंट 378 आणि गोल्ड 423 रुपये प्रतिबॅग या दराने तर अंबुजाचे सिमेंट 387 आणि गोल्ड 432 रुपये या दराने मिळण्याची शक्यता आहे.

घरांचे भाव गगनाला भिडलेलेच

सिमेंटच्या किमती कमी झाल्यामुळे घरांच्या किमतीही कमी होतील अशी आशा होती. परंतु जीएसटीच्या घोषणेआधीच सिमेंट कंपन्यांनी चलाखीने सिमेंटचे दर वाढवले. त्यामुळे जीएसटीत घट झाली असली तरीही सिमेंटचे दर फार कमी होणार नाहीत. पूर्वीचे दर पुन्हा लागू होतील. त्यामुळे आपोआपच घरांच्या किमतीही फारशा कमी होणार नाहीत. त्यामुळे घरांचे भाव गगनाला भिडलेलेच राहातील, असे रियल इस्टेट उद्योगातील तज्ञांनी म्हटले आहे.