
पाकिस्तान नोव्हेंबर महिन्यात आपल्या पहिल्या टी-20 तिरंगी मालिकेचे आयोजन करणार आहे. या मालिकेत अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघांचाही सहभाग असेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य परिचालन अधिकारी सुमेर अहमद सय्यद यांनी रविवारी या मालिकेची अधिपृत घोषणा केली.
पाकिस्तानात पहिल्यांदाच टी-20 तिरंगी मालिका होत असून आम्हाला श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे स्वागत करण्याचा आनंद आहे. ही स्पर्धा केवळ पुढील वर्षीच्या आयसीसी पुरुष टी–20 विश्वचषकाची तयारी करण्यासाठीच उपयुक्त ठरणार नाही, तर चाहत्यांना विविध ठिकाणी रंगतदार सामने पाहण्याची संधी मिळेल, असे सय्यद म्हणाले.
या मालिकेत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळणार असून गुणतालिकेत अव्वल दोन संघ 29 नोव्हेंबर रोजी लाहोर येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भिडतील.
तिरंगी मालिकेची सुरुवात 17 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने होईल. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान पहिल्यांदाच पाकिस्तानच्या भूमीवर टी–20 सामने खेळणार आहे.
तिरंगी स्पर्धेचे वेळापत्रक ः
17 नोव्हेंबर ः पाकिस्तान-अफगाणिस्तान (रावळपिंडी) 18 नोव्हेंबर ः श्रीलंका-अफगाणिस्तान (रावळपिंडी) 22 नोव्हेंबर ः पाकिस्तान-श्रीलंका (लाहोर) 23 नोव्हेंबर ः पाकिस्तान-अफगाणिस्तान (लाहोर) 25 नोव्हेंबर ः श्रीलंका-अफगाणिस्तान (लाहोर) 27 नोव्हेंबर ः पाकिस्तान–श्रीलंका (लाहोर) 29 नोव्हेंबर ः अंतिम सामना (लाहोर)