
मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह होता. मात्र या उत्साहाला विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांचे गालबोट लागले. गणपतीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान पुणे, ठाणे, अमरावती, नाशिक आदी ठिकाणी भाविक बुडाल्याच्या घटना घडल्या. यात 15 जणांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जणांना दुखापत झाली आहे.
साकीनाका येथे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॉलीला उच्चदाब वीज वाहिनीच्या वीजवाहक तारेचा स्पर्श झाला आणि दुर्घटना घडली. त्यात ट्रॉलीत उभे असलेले 5 भाविक होरपळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेत बिनू शिवकुमार या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व संपूर्ण परिस्थितीचा माहिती घेतली. जखमींची विचारपूस करून त्यांच्यावर योग्य उपचारासाठी संबंधितांना सूचना केल्या.
राजगुरूनगरात चौघे बुडाले
चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठय़ांमध्ये गणेश विसर्जन करताना चार युवक बुडाले. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा शोध अद्याप सुरू आहे. वाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत अभिषेक संजय भाकरे (21, रा. कोयाळी, ता. खेड) व आनंद जयस्वाल (28, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे विसर्जनासाठी उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलवर गेल्याने ते बुडाले. यामध्ये आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला, तर अभिषेक भाकरे याचा शोध अजूनही सुरू आहे.
नदीच्या प्रवाहात वाहून गेले
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे रवींद्र वासुदेव चौधरी (45) हे नदीत विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू असून स्थानिक नागरिकांसह बचाव पथके नदीकाठी शोधमोहीम राबवत आहेत.
विहिरीत पडून मृत्यू
बिरदवडी (ता. खेड) येथील संदेश पोपट निकम (35) हे गणेश विसर्जनासाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले व बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दल व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
कुकडी नदी पात्रात एक जण बुडाला
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा या ठिकाणी कुकडी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या अशोक खंडू गाडगे (23) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर शोधमोहीम सुरू होऊन तब्बल 19 तासांनी अशोक गाडगे यांचा मृतदेह कुकडी नदीपात्रात 30 फूट खोल सापडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.
तळेगाव ढमढेरेत युवक बुडाला
तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत येथील बोरा फार्मजवळ भीमा नदीत गणपती विसर्जनसाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले युवक बुडाला. त्याचा शोध सुरू आहे.