
अमेरिकेच्या टॅरिफमुळे संपूर्ण जगभरात अशांतता पसरली आहे. अमेरिकेच्या या नव्या धोरणाविरोधात अनेक देश एकत्र येत आहेत. ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे 180 हून अधिक देशांवर 10% ते 50% पर्यंतचे शुल्क लादले गेले आहे. या शुल्काच्या माध्यमातून ट्रम्प प्रशासनाने अब्जावधी डॉलर्स कमावले आहेत. याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेतूनच विरोध होत असून अनेक अधिकाराही या विरोधात एकवटले आहे. तसेच याबाबत ट्रम्प यांना न्यायालयातही आपली बाजू स्पष्ट करावी लागली आहे.अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी ट्रम्प सरकारच्या टॅरिफ संबंधात इशारा दिला आहे त्य़ांच्या म्हणण्यानुसार, जर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केले, तर अमेरिकेला टॅरिफमधून मिळवलेले अब्जावधी डॉलर्स परत करावे लागू शकतात, असे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी स्पष्ट केले.
एनबीसी न्यूजवरील एका कार्यक्रमादरम्यान, अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या टॅरिफ प्रकरणाबद्दल विचारण्यात आले. जर सर्वोच्च न्यायालयाने29 ऑगस्टच्या फेडरल कोर्टाच्या निर्णयाला मान्यता दिली तर काय होईल? यावर स्कॉट बेसंट म्हणाले: “आम्हाला जवळजवळ अर्धे शुल्क परत करावे लागेल. जे सरकारच्य़ा तिजोरीवर परिणाम करणारे असेल… जर न्यायालयाने असा निर्णय दिला तर त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने आत्तापर्यंत 180 हून अधिक देशांवर टॅरिफ लागू केला आहे. यामध्ये हिंदुस्थान, चीन, कॅनडा आणि ब्राझील यांसारख्या देशांचा समावेश आहे. ट्रम्प सरकारने एकट्या हिंदुस्थानवर 50 टक्के शुल्क लादले आहे. एका अहवालानुसार, ट्रम्प सरकारने ऑगस्टमध्येच टॅरिफमधून 31 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. 7 ऑगस्ट 2025 पासून हिंदुस्थानवर 25% आणि 27 ऑगस्ट 2025 पासून 50% शुल्क लादण्यात आले आहे.