
चिपळुणात गर्दीच्या रस्त्यावरून अनेक रिक्षा प्रवासी घेऊन धावत आहेत. पण त्यातलीच एक रिक्षा लोकांचे लक्ष वेधून घेते. रिक्षा क्रमांक MH-08 AQ 9271 – नावच आहे ‘टेरवची कन्या’. प्रवाशांसाठी खास सजवलेली, आधुनिक सुविधा आणि संस्कारांचा संगम असलेली ही रिक्षा आज शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
टेरव राधाकृष्णवाडीचा परेश पांडुरंग काणेकर हा तरुण उदरनिर्वाहासाठी रिक्षा व्यवसायात उतरला. गेले काही महिने तो रिक्षा चालवत होता. प्रवासी चढले की, त्यांच्या गप्पा त्याच्या कानावर पडत; कोणीतरी प्रवासात मोबाईल चार्जिंग नसल्याची हळहळ करत, तर कुणी वृत्तपत्र न वाचल्याची खंत व्यक्त करत. कुणाच्या बोलण्यात आजारपणावर प्राथमिक उपचारांची गरज व्यक्त होत असे.
या साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या जोडणीतून परेशच्या मनात एक मोठी कल्पना आकार घेत गेली. “माझी रिक्षा प्रवासापुरती न राहता प्रवाशांसाठी सुविधा देणारी, सुरक्षितता देणारी, विचार देणारी व्हावी.”
सजली ‘टेरवची कन्या’
रिक्षात प्रथमोपचार पेटी ठेवली, आपत्कालीन प्रसंगात उपयोग व्हावा म्हणून, छोट्याशा पेटीत रोजची वृत्तपत्रे ठेवली, जेणेकरून प्रवासी प्रवासात वाचू शकतील, फ्री वायफाय, मोबाईल चार्जिंग पॉईंटची सोय केली, ज्यामुळे एखाद्याचा फोन बंद पडला तरी अडचण नको, कॉलेजमधील मुली व महिलांसाठी आरशासह कंगवा, पावडर, लिपस्टिक, काजळ, खोबरेल तेल, अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपर्यंत काळजी घेतली.
रिक्षाच्या पुढे स्वामी समर्थांचा आशीर्वाद, तर मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा. प्रवास करताना प्रवाशांना श्रद्धा आणि प्रेरणा दोन्ही मिळावी म्हणून. इतकेच नव्हे तर रिक्षात चिपळूण परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती व अंतरफलकही लावला. रात्रीचा प्रवास सुखकर होण्यासाठी आतील आणि बाहेरील रंगीबेरंगी रोषणाई केली.
परेशचा स्वभाव मनमिळावू. प्रवाशांशी तो गप्पा मारतो, हसतो-खेळतो. त्यामुळे लोक केवळ प्रवासासाठी नाही, तर खास ‘टेरवची कन्या’ या रिक्षेतून प्रवास करण्यासाठी उत्सुक असतात. कॉलेज तरुणाई, महिला, अगदी ज्येष्ठ प्रवासी – प्रत्येकालाच या रिक्षेत काहीतरी वेगळं मिळतं.
चिपळूण शहरात या रिक्षेची चर्चा आहे. प्रवासी प्रवास संपल्यावर आनंदाने म्हणतात, “ही रिक्षा म्हणजे साधं वाहन नाही, तर एक छोटंसं सुखाचं घर आहे.” लोकांनी तिच्या सुविधा, विचार आणि कल्पकतेचं भरभरून कौतुक केलं आहे. साध्या रिक्षेतून प्रवासाची नवी व्याख्या करणारी ही ‘टेरवची कन्या’ परेश काणेकर यांच्या कल्पकतेचा, सेवाभावाचा, श्रद्धेचा झळाळता नमुना ठरली आहे.