पुढील आठवड्यात पावसाचे पुन्हा धुमशान; मुंबई, ठाणे, कोकणासह अनेक भागांत ‘अतिमुसळधार’ कोसळणार

गणेशोत्सवात जोरदार कोसळलेला पाऊस पुढील आठवडय़ात पुन्हा धुमशान घालणार आहे. 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ या जिह्यांत अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्र तसेच कोकणातील नद्याकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत सूर्यदर्शन झाले आहे. 13 सप्टेंबरपर्यंत ही परिस्थिती ‘जैसे थे’ राहील. त्यानंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. गणेशोत्सव काळात कोकणात पावसाने धो-धो हजेरी लावली. त्याचप्रमाणे पुढील आठवडय़ात पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच मुंबई शहरातील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. नगर, संभाजीनगर, जालना या भागातदेखील मुसळधार पाऊस पडून नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश धरणे आधीच भरली आहेत. त्यामुळे मुसळधार पावसाच्या हजेरीत धरण क्षेत्राच्या खालच्या भागांतील नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांची लाहीलाही सुरू

मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी दुपारी अचानक उन्हाची तीव्रता वाढली आणि मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही सुरू झाली. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सांताक्रुझमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन पारा 32 अंशांच्या घरात गेला. याचवेळी किमान तापमान 24 अंशांवर गेले होते. सायंकाळी मात्र ढगाळ वातावरणाची डोकेदुखी सहन करावी लागली.