
तालुक्यातील चणकापूर शासकीय आश्रमशाळेतील तापाने फणफणलेल्या रोहित बागुल या दहा वर्षीय विद्यार्थ्याचा रविवारी मृत्यू झाला. उपचारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांच्या टेबलावर पाच तास मृतदेह ठेवून आक्रोश केला. आदिवासी आयुक्तालयाने अधीक्षकासह मुख्याध्यापकाला बडतर्फ केल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत सरले दिगर गावी मुलावर अंत्यसंस्कार केले.
या आश्रमशाळेत सरले दिगर येथील रोहित विलास बागुल (10) हा इयत्ता तिसरीत शिकत होता. तो शुक्रवारपासून आजारी होता. मात्र आश्रमशाळेने वेळेत लक्ष दिले नाही, असा आरोप होत आहे. तो मित्राच्या पालकांसमवेत घरी आला तेव्हा तापाने फणफणला होता. त्याला मध्यरात्री अभोणा येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उशीर झाल्याने उपचार मिळाले नाहीत. कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.