नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध निदर्शने, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले

नेपाळनंतर आता फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरुद्ध जनतेचा रोष दिसून येत आहे. जनता रस्त्यावर येऊन इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या धोरणांविरुद्ध निषेध करत आहेत. राजधानी पॅरिसमध्ये जाळपोळ झाली असून, पोलिसांवरही दगडफेक  करण्यास सुरुवात झाली आहे. फ्रान्समधील जनता राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरुद्ध निषेध करत आहेत. जनतेच्या म्हणण्यानुसार, मॅक्रॉन सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी काहीही केले नाही आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन खूपच खराब आहे.

सोशल मीडियावर ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ या आवाहनाने ही निदर्शने सुरू झाली आहेत. त्यामुळेच आता जनता संघटित पद्धतीने निषेध करण्यासाठी बाहेर पडलेली आहे. हजारो पोलिस निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सध्या त्यांना नियंत्रित करणे कठीण होऊन बसले आहे. संपूर्ण फ्रान्समध्ये निदर्शक निदर्शने करत असून, त्यांनी वाहतूक पूर्णपणे रोखली आहे. कचऱ्याचे डबे जाळले जात आहेत आणि अनेक ठिकाणी पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष सुरू आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून सर्व अडथळे लवकरात लवकर दूर करता येतील. असे सांगितले जात आहे की डझनभर निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. एपी वृत्तसंस्थेच्या मते, फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी देशव्यापी निदर्शनांच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे २०० जणांना अटक केल्याचे म्हटले आहे.