
दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मेलमध्ये बॉम्ब कुठे ठेवलाय याचा उल्लेख नसल्याने संपूर्ण हायकोर्ट रिकामे करण्यात आले आहे. न्यायाधीश, वकील आणि इतर कर्मचाऱ्यांसह कायदेशीर कामासाठी आलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. पोलीस, सुरक्षा जवान आणि बॉम्ब शोधक पथक हायकोर्टात दाखल झाले असून तपास सुरू आहे.
शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दिल्ली हायकोर्टमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आला. हायकोर्टात तीन बॉम्ब ठेवण्यात आले असून 2 वाजेपर्यंत हायकोर्ट रिकामे करा, असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. हे बॉम्ब नक्की कुठे ठेवले याचा उल्लेख नसल्याने संपूर्ण हायकोर्ट रिकामे करण्यात आले आहे. न्यायाधीशांना सुनावणी रोखत बाहेर धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वकील आणि कायदेशीर कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना बाहेर काढले. बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बचा शोध सुरू आहे. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
#WATCH | Delhi | Delhi High Court receives a bomb threat via mail. Precautionary measures taken by the Delhi police and the court has been vacated. https://t.co/7mQhpAsLsU pic.twitter.com/IYOFFbna4n
— ANI (@ANI) September 12, 2025
मेलमध्ये नेमकं काय?
– हायकोर्टात 3 बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. 2 वाजेपर्यंत सर्वांना बाहेर काढा.
– मेलमध्ये राजकीय नेत्यांनाही निशाणा बनवण्यात येणार असून काही विशिष्ट नावांचाही उल्लेख.
– मेलमध्ये तामीळनाडूतील राजकीय पक्ष डीएमकेचाही उल्लेख
– डॉ. एझिलान नागनाथन यांच्याकडे डीएमकेची सूत्र असावीत असाही उल्लेख
– उदयनिधी स्टॅलिन यांचा मुलगा इनबानिधी उदयनिधी याच्यावर अॅसिड टाकण्याची धमकी
पोलीस तपास सुरू
दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत हायकोर्ट रिकामे केले असून याची फॉरेन्सिक चौकशी सुरू केली आहे. मेल कोणत्या आयपी एड्रेस किंवा सर्व्हरवरून पाठवण्यात आला? मेल हेडरमध्ये छेडछाड झालीय का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आहे. याद्वारे मेल पाठवण्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच मेलमध्ये ज्या नावाचा उल्लेख आहे त्यांचीही सुरक्षा वाढवण्यात येत असून सुरक्षा यंत्रणांना अलर्ट ठेवण्यात आले आहे.