‘माझं कुंकू, माझा देश’ उद्या शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याविरुद्ध जनक्षोभ

पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱया मोदी सरकारविरोधात देशभरात जनक्षोभ पाहायला मिळत आहे. शिवसेनेने हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याविरुद्ध ‘माझं कुंकू, माझा देश’ या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून शिवसेनेच्या हजारो रणरागिणी रविवारी रस्त्यावर उतरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करणार आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 माताभगिनींचे कुंकू पुसले गेले. त्यानंतर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असा दम भरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पाणी रोखले. पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही, अशा गर्जनाही मोदींनी केल्या. असे असताना पाकिस्तानसोबत आशिया चषकात क्रिकेटचा खेळ मांडण्यास मात्र मोदी सरकारने होकार दिल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हाच जनक्षोभ रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.

सौभाग्याचं लेणं मोदींना पाठवून निषेध नोंदवणार

आशिया चषकात रविवारी दुबईच्या मैदानावर हा सामना होणार असून त्याचा निषेध करत महाराष्ट्राच्या घराघरातून माता-भगिनी पंतप्रधान मोदी यांना सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू पाठवणार आहेत.

हिंदुस्थान-पाकिस्तान सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात, तालुक्यात, जिह्यात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

अस्सल भाजपा सत्तेत असती तर या सामन्याला परवानगी मिळालीच नसती

भाजपने आपली विचारधारा बदलली आहे. अस्सल भाजप सत्तेत असती तर पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याला परवानगी मिळाली नसती, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. आज खरी भाजप सत्तेत असती तर त्यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की, पाकड्यांसोबत खेळायची तुमची हिंमत कशी काय होते? पण आज बीसीसीआय पैशाची लालूच दाखवून ज्या देशाने आपल्यावर हल्ला केला, आपल्या माताभगिनींचे कुंकू पुसलं, त्याच पाकड्यांसोबत क्रिकेट खेळत आहे हे दुर्दैव आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.