आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो! भाजपच्या कार्यपद्धतीवर अमेरिकेत पोस्टरमधून निशाणा; मोदी, शहा, योगींच्या व्यंगचित्रावरून खळबळ

अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात आयोजित कार्यशाळेदरम्यान लावलेले सध्या हिंदुस्थानात चर्चेचा विषय ठरले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधण्यात आला आहे. पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि त्यासोबत ‘आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो’ असा संदेश लिहिल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित कार्यशाळा आयआयटी मुंबईने ‘स्पॉन्सर’ केल्याचे वृत्त आहे. मात्र आयआयटीने आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठातील इन्स्टिटय़ूट फॉर साऊथ एशिया स्टडीज येथे शुक्रवारपासून ‘दक्षिण आशियाई भांडवलशाही’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या पोस्टरमध्ये हिंदुस्थानातील तीन भाजप नेत्यांची व्यंगचित्रे रेखाटण्यात आली. वादाच्या भोवऱयात सापडलेल्या ‘भांडवलदार हिंदुस्थानचे पिरॅमिड’ नावाच्या पोस्टरमध्ये वरच्या रांगेत उद्योगपतींची व्यंगचित्रे आहेत. पोस्टरमध्ये ‘आम्ही तुमच्यावर राज्य करतो’ असे नमूद केले आहेत. दुसऱया रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मिळतीजुळती व्यंगचित्रे रेखाटली आणि त्यावर ‘आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो’ असे विधान केले. सोशल मीडियात पोस्टरवर तीव्र पडसाद उमटले आहेत.

कार्यशाळा आयोजनाशी आयआयटीचा संबंध नाही!

‘दक्षिण आशियाई भांडवलशाही’ कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये आयआयटी मुंबईचे नाव असल्याचे समोर आले. त्यानंतर आयआयटीविरोधात सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत, मात्र त्यावर खुलासा करताना आयआयटीने कार्यशाळेच्या आयोजनात आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगून यापुढे बर्पले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स-अॅमहर्स्ट विद्यापीठाच्या संबंधित प्राध्यापकांशी संबंध तोडणार असल्याचे जाहीर केले आहे.