भिवंडीत तीन मुन्नाभाईंवर गुन्हे, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या तीन मुन्नाभाईंवर भिवंडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या भामट्यांनी कोणतीही पदवी नसताना दवाखाने थाटून वैद्यकीय उपचार देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने भीमराव कावडे, मोहम्मद शमीम सिद्दिकी, अयुब हनिफ या तीन बोगस डॉक्टरांचे प्रमाणपत्र तपासून कारवाई केली.

नागाव परिसरातील ज्योत्स्नानगर येथील भक्तीसागर बिल्डिंग येथे भीमराव कावडे हे बेकायदेशीर दवाखाना चालवत असल्याची तक्रार पथकाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने या दवाखान्यावर धाड टाकत प्रमाणपत्र तपासली असता त्याच्याकडे एन.ई.एच.एन.ची पदवी असल्याचे निदर्शनात आले, तर दुसरीकडे या पथकाने आझादनगर येथील मोहम्मद शमीम सिद्दिकी यांच्या दवाखान्यावर कारवाई केली असता त्याच्याकडे बी.ई.एम.एस.ची पदवी असल्याचे समोर आले. या दोन्ही कारवायांनंतर पथकाने आपला मोर्चा गायत्रीनगर येथील नुरीनगर डोंगरपाडा येथे वळवला. तेथे एका गाळ्यात दवाखाना थाटून बसलेल्या अयुब हनिफ याच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्याच्याकडे कोणतीही पदवी नसून तो बेकायदेशीर दवाखाना चालवत असल्याचे उघड झाले.

दरम्यान, पथकाने तीनही क्लिनिकची झडती घेतली असता तेथे त्यांना अॅलोपथिक औषधांचा बेकायदेशीर साठा व उपकरणे मिळाली. याप्रकरणी आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तीनही बोगस डॉक्टरांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.