
>> पराग पोतदार
ही केवळ ग्रंथालयाची गोष्ट नाही, ही एका अशा माणसाच्या अढळ जिद्दीची, ज्याने पुस्तकासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले त्याची गोष्ट आहे. कर्नाटकमधील मैसूरजवळील केन्नालु गावातील 76 वर्षीय अंके गौडा यांनी 15 लाखांहून अधिक पुस्तके असलेले एक अनोखे ग्रंथालय निर्माण केले आहे.
कर्नाटकमधील मैसूरजवळील केन्नालु गावातील 76 वर्षीय अंके गौडा यांनी 15 लाखांहून अधिक पुस्तके असलेले एक अनोखे ग्रंथालय निर्माण केले आहे. हे मोफत ग्रंथालय संशोधक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी ज्ञानाचा अमूल्य खजिना ठरले आहे. मर्यादित साधनसंपत्ती व साध्या जीवनशैलीनंतरही गौडा यांनी आपल्या जिद्द आणि आवडीतून एक प्रेरणादायक खासगी ग्रंथालय उभे केले आहे.
गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले अंके गौडा यांनी कन्नड साहित्यात एम.ए. केले असून पांडवपूरा साखर कारखान्यात 30 वर्षे काम केले. त्यांनी आपल्या वेतनातील 80 टक्के रक्कम पुस्तकांवर खर्च केली. प्रवासादरम्यान शहरांमधून पुस्तके खरेदी करणे हे त्यांच्या जीवनाचा भाग बनले होते.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना गौडा यांनी पुस्तकांची कमतरता अनुभवली आणि त्यामुळे त्यांनी स्वतचे पुस्तक संकलन सुरू करण्यास सुरुवात केली. नोकरीतून मिळालेल्या प्रत्येक रुपयाची त्यांनी पुस्तक खरेदीसाठी गुंतवणूक केली. एवढंच नाही तर त्यांनी मैसूरमधील स्वतची मालमत्ता विकून त्या पैशांतूनही दुर्मिळ ग्रंथ खरेदी केले. रामकृष्ण आश्रमाच्या पुस्तकांनी सुरुवात करून त्यांनी हळूहळू एक भव्य ग्रंथालय उभारले, जे आज लाखो वाचकांसाठी खुले आहे.
गौडा यांच्या ग्रंथालयात 15 लाखांहून अधिक पुस्तके आहेत, ज्यामध्ये 1832 पासून आजपर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा समावेश आहे. 22 पेक्षा अधिक भाषांमध्ये असलेल्या या पुस्तकांमध्ये साहित्य, पुराणकथा, विज्ञान, तंत्रज्ञान, बालसाहित्य, प्रवासवर्णन आणि संशोधन यासारख्या असंख्य विषयांचा समावेश आहे. लहानशा पुस्तिकेपासून ते मोठय़ा ग्रंथांपर्यंत प्रत्येक वाचकाच्या गरजा इथे पूर्ण होतात. हे ग्रंथालय म्हणजे भाषिक वैविध्याचे संग्रहालय आहे, जिथे प्रत्येक वाचकाला आपली आवडती किंवा गरजेची माहिती सहज मिळते.
त्यांच्या या समर्पणातून हे सिद्ध होते की, मर्यादित साधनसंपत्ती असूनही जिद्द असेल तर स्वप्ने पूर्ण करता येतात. आज त्यांचा खासगी संग्रह एक सार्वजनिक ग्रंथालय बनलेला आहे, जिथे कुठल्याही वयोगटातील वाचक मोफत वाचन करू शकतात. संशोधक, पीएच.डी. विद्यार्थी, शिक्षक, समीक्षक, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक इथे नियमितपणे भेट देतात. हे ग्रंथालय केवळ पुस्तकांचे नव्हे, तर विचार, संस्कृती आणि संवादाचे केंद्र बनले आहे.
आजही 76 वर्षांचे गौडा एकटेच हे ग्रंथालय सांभाळतात. पुस्तकांची धूळ झटकणे, वाचकांना मदत करणे हे त्यांचे रोजचे काम आहे. कोणतीही कर्मचारी मदत नसताना ते दररोज 250 हून अधिक बोऱयांमध्ये ठेवलेली पुस्तके वर्गवारीनुसार लावत असतात.
याविषयी अंके गौडा म्हणतात, पत्नी विजयलक्ष्मी आणि मुलगा सागर यांनी या प्रवासात खंबीर साथ दिली. कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे स्वप्न अशक्य होते. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात जिथे पुस्तक वाचनाची सवय कमी होत चालली आहे, तिथे अंके गौडा यांचं हे ग्रंथालय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही केवळ ग्रंथालयाची गोष्ट नाही, ही एका अशा माणसाच्या अढळ जिद्दीची, ज्याने पुस्तकासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले त्याची गोष्ट आहे.
अंके गौडा यांनी उभारलेल्या या ग्रंथालयात कन्नड भाषेतील पुस्तकांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. मात्र येथे हिंदी, संस्कृत, इंग्रजी, तामीळ अशा भारतीय भाषांबरोबरच परदेशी भाषांतील पुस्तकेही उपलब्ध आहेत. अर्धा मिलियनहून अधिक परदेशी दुर्मिळ पुस्तके, जवळपास 5 हजार शब्दकोश आणि लाखो ग्रंथ विविध विषयांवर येथे उपलब्ध आहेत.


























































