
जातीय हिंसाचारात पोळून निघालेल्या मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल दोन वर्षांनी पोहोचले. मणिपूरमधील कुकीबहुल चुडाचंदपूर येथे त्यांनी एका सभेला संबोधित केले. विकासासाठी शांतता गरजेची असून सर्व संघटनांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्तांची विचारपूस केली. त्यानंतर सभेला संबोधित केले. ‘मणिपूर राज्य भारतमातेच्या मुकुटातील रत्न आहे. साहस आणि वीरांची भूमी आहे. येथील महान व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन आमचे सरकार पुढे चालले आहे. मागील काळात येथे झालेला हिंसाचार दुर्दैवी होता. आता आपल्याला शांतता आणि विकासाच्या मार्गाने पुढे जायचे आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे’, असे मोदी म्हणाले.
कुठे गेला तुमचा राजधर्म?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर टीका केली. ‘मणिपूरमध्ये 864 दिवस हिंसाचार सुरू होता. त्यात 300 लोक मारले गेले. 67 हजार लोक विस्थापित झाले, 1500 हून जास्त जखमी झाले. मोदींनी तेव्हा आणि त्यानंतर तब्बल 46 वेळा विदेश दौरे केले, पण मणिपुरात गेले नाहीत. कुठे गेला तुमचा राजधर्म,’ असा सवाल खरगे यांनी केला. ‘मोदींचा हा दौरा केवळ एक दिखावा आहे. इम्फाळ आणि चुडाचंदपूरमध्ये त्यांनी केलेला रोड शो हा तेथील हिंसाचारग्रस्त लोकांचा घोर अपमान आहे’, असे खरगे म्हणाले.
मोदींनी आधीच जायला हवे होते!
‘नरेंद्र मोदींनी याआधीच मणिपूरला जायला हवे होते. त्यांनी दोन वर्षे हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. जे होतेय ते होऊ दिले. लोकांना मरू दिले. त्यानंतर आता त्यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानी पंतप्रधानांची ही परंपरा नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, देशात कुठे काही अनुचित घडले की पंतप्रधान तिथे धाव घेत. ती परंपरा पाळायला मोदींनी दोन वर्षे लावली, असा खोचक टोला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी हाणला.