एल्फिन्स्टन ब्रीज बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी, मुंबईकरांचे हाल; टिळक ब्रीजवर लांबच लांब रांगा स्कूल बस आणि रुग्णवाहिकांची गती मंदावणार… चिंता वाढली

सवाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे प्रभादेवी ते परळ हे अवघ्या पाच मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी पाऊण ते एक तासाचा वेळ लागत होता. लोअर परळ किंवा दादर येथून वळसा घेऊन परळला पोहोचावे लागत असल्यामुळे टाटा, केईएम, वाडिया रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे हाल झाले. सायंकाळी टिळक पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे दादरमध्ये अभूतपूर्व कोंडी झाली. हा पूल नव्याने बांधून पूर्ण होईपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

प्रभादेवी आणि परळला जोडणारा एल्फिन्स्टन पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रभादेवी आणि वरळीत अनेक कॉर्पोरेट कार्यालये तसेच एसटी डेपो आहे. परळमध्ये टाटा, केईएम, वाडिया यासारखी महत्त्वाची रुग्णालये तसेच डॉ. शिरोडकर हायस्कूल, एम. डी. कॉलेज, आर. एम. भट, सोशल सर्व्हिस लीग अशा शाळा-कॉलेजेस आहेत. नवीन डबलडेकर पुलाच्या उभारणीसाठी एल्फिन्स्टन पुलावर हातोडा पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी वाहनचालकांची तारांबळ उडाली. सायंकाळच्या वेळी टिळक पुलाजवळ वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी टिळक पूल, भारतमाता, चिंचपोकळी येथे मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता.

बेस्ट बसमार्गात बदल

एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे या पुलावरून धावणाऱया ए-162, 168, ए-177, 201 या बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या पुलावरून धावणाऱया बस आता संत रोहिदास चौक, एन. एम. जोशी मार्ग येथून वळविण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

एसटीचे तिकीट 10 रुपयांनी महागले

एसटी महामंडळाच्या परळ आगारातून ये-जा करणाऱ्या बससेवेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. एसटीची वाहतूक चिंचपोकळी पुलावरून वळवण्यात आली आहे. हा वळसा घालताना जवळपास सात किमीचे अंतर वाढणार असून इंधन खर्चात वाढ होणार आहे. परिणामी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत एसटीच्या तिकिटावर अतिरिक्त 10 रुपयांचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागणार आहे. एसटीच्या 194 बसफेऱया चिंचपोकळीमार्गे धावणार आहेत.

एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे रुग्णांचे खूप हाल होणार आहेत. दिवसाला 50 ते 60 रुग्णवाहिका या पुलावरून जातात. आता हा पूल बंद झाल्यामुळे रुग्णवाहिकांना दादर किंवा लोअर परळवरून परळ गाठावे लागणार आहे. अशा परिस्थितीत एखादा गंभीर रुग्ण रुग्णालयापर्यंत सुखरूप पोहोचेल का, याची भीती सतावतेय. किमान रुग्णवाहिकांसाठी तरी पर्यायी मार्गाची व्यवस्था करायला हवी होती. – सूर्यकांत सावंत, स्थानिक

आमचा गौरीशंकरजवळ फुल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यासाठी रोज मी वरळीवरून बेस्ट बसने परळला येते. या पुलावरून जाणारी बस बंद केल्यामुळे मला आता प्रभादेवीला उतरावे लागले. तिथून रेल्वेचा ब्रीज चढून तिकीट खिडकीजवळ आले आणि समोरच्या दिशेला जाऊन पुन्हा ब्रीजखाली उतरावे लागले. आमच्यासारख्या वयोवृद्धांसाठी प्रभादेवी ते परळ गाठणे ही तारेवरची कसरत आहे. – गीताश्री मार्गी, फुल विव्रेत्या

रेल्वेचा नवा पादचारी पूल लवकरच

पूर्व आणि पश्चिमेला जाणाऱ्या रुग्ण आणि पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रभादेवी स्थानकावरील नवीन पादचारी पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर हा पूल येत्या 20 तारखेपासून पादचाऱ्यांच्या सेवेत येणार आहे.