Mumbai Rain Update- महिन्याभरात तिसऱ्यांदा मोनोरेलला ब्रेक; तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांचे हाल

गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर गेलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासूनच पुन्हा जोर धरला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. अशातच काही तांत्रिक बिघाडामुळे आता मोनो रेलही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळ्यादरम्यान एक मोनोरेल तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. त्यामुळे मोनोरेलमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मोनोरेल बंद पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मोनोरेलवर विश्वास ठेवून पुन्हा मोनोरेलने प्रवास करावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावर परिणाम –
रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.