
आरोग्याच्या कारणास्तव मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीक तीन मूर्ती जैन मंदिर येथे नवा कबुतरखाना उभारण्यात आला. याच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रहिवाशांचे हित जपून मुंबईतील प्रत्येक वॉर्डात अशा प्रकारचा कबुतरखाना उभारण्याचा मनोदय व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई केली. तसेच कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली. यानंतर जैन समाजाने आक्रमक आंदोलन केलं होतं. यानंतर हा वाद न्यायालयात गेला असता, मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान रविवारी मुंबईत बोरिवलीत आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या जागेवर नव्याने कबुतरखाना सुरू करण्यात आला. या कबुतरखान्याचा कुणालाही त्रास होणार नाही, असे सांगत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या प्रत्येक वार्डात कबुतरखाने उभारण्यात यावेत, असे सांगितले. यामुळे मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
बीकेसी, कोस्टल रोड, आरेत कबुतरखाने
नागरिकांना आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून कबुतरांना अन्न आणि पाणी मिळावे यासाठी मध्यम मार्ग निवडला पाहिजे. मानवी वस्तीपासून दूर जंगली भागात कबुतरांना खाण्याची ठिकाणे उभारली पाहिजेत. बीकेसीमध्ये, कोस्टल रोडलगत आणि आरे कॉलनीच्या आत कबुतरखाने उभारता येतील, असे लोढा म्हणाले.