फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय?

फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मग भेटीगाठी होत गेल्या आणि प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने एका प्रेमकहाणीचा भयानंक अंत झाला आहे. प्रेयसीपासून सुटका मिळवण्यासाठी प्रियकरानेच तिची हत्या करत घातपात दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रियकराचा हा प्रयत्न फसला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मुकेश कुमारी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मानाराम असे आरोपीचे नाव आहे.

राजस्थानातील बाडमेरमध्ये ही घटना घडली. चवा गावात राहणाऱ्या मानारामची ऑक्टोबर 2024 मध्ये झुंझुनूमधील मुकेश कुमारीसोबत फेसबुकवर मैत्री झाली. मग मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मग दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. मुकेश कुमारी ही अंगणवाडीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असून तिचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. मानारामही विवाहित असून पेशाने शिक्षक आहे.

मानारामने मुकेश कुमारीशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र मुकेश कुमारीने मानारामकडे लग्नासाठी तगादा लावला होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. 10 सप्टेंबर रोजी मुकेश कुमारी बाडमेरला मानारामला भेटायला गेली होती. त्यावेळी तिने मानारामकडे त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याचा हट्ट केला. यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोघांमधील वाद मिटला.

यानंतर मानाराम तिला शिवाजी नगर भागातील एका घरात घेऊन गेला. तिथे त्याने लोखंडी सळीने डोक्यात वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मुकेश कुमारीचा मृतदेह कारमध्ये ठेवून घातपात असल्याचा बनाव केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या वकिलांना कारमध्ये मृतदेह असल्याची माहिती दिली. वकिलांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी सखोल तपास केला असता मानारामनेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.