
कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू व्यवसायावर मोठी कारवाई करत रसायनयुक्त बनावट देशी दारू तयार करणाऱया टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून 11 लाख 38 हजार रुपयांची रसायनयुक्त बनावट दारू तयार करण्याचे साहित्य आणि दोन वाहने जप्त करण्यात आली.
मयूर कृष्णदेव कदम (रा. करवडी, ता. कराड), विजय शिवाजी निगडे (रा. शिरवळ, ता. कराड) आणि मंदार कृष्णदेव कदम (वय 36, रा. करवडी, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि कराड उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार कराड शहर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ओगलेवाडी दूरक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सैदापूर गाव हद्दीत, जिव्हाळा ढाब्याजवळील अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी मयूर कदम, विजय निगडे आणि मंदार कदम हे स्कॉर्पिओ गाडीतून दारूच्या बाटल्या व लेबलसह बनावट दारू वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. तसेच मारुती सुझुकी 800 या गाडीत रसायन भरलेले सहा प्लॅस्टिक कॅन सापडले.
चौकशीदरम्यान संदेश पाटील यांच्या फ्लॅटमध्ये ते बनावट देशी दारू तयार करत असल्याची कबुली दिली. आरोपींकडून दोन चारचाकी वाहने, रसायनयुक्त बनावट देशी दारू व उत्पादन साहित्य असा 11 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळी, अशोक भापकर, उपनिरीक्षक निखिल मगदूम, कृष्णा डिसले, सतीश आंदेलवार, अशोक वाडकर, संदीप कुंभार, सजन जगताप, संतोष पाडळे, मुकेश मोरे, महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख यांच्या पथकाने कारवाई केली.