लोढा डेव्हलपर्सचा माजी संचालक राजेंद्र लोढा याला अटक

लोढा डेव्हलपर्स कंपनीत कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीची 85 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कंपनीचा माजी संचालक राजेंद्र लोढा याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. राजेंद्र याच्यासह एकूण दहा जणांविरोधात कंपनीच्या मुख्य लायझन अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.

राजेंद्र लोढा हा लोढा डेव्हलपर्स कंपनीत संचालक होता. राजेंद्र याला कंपनीने केवळ जागा संपादन करण्याचा अधिकार दिला होता. त्याला जमीन विक्रीचा कोणताही अधिकार नव्हता. असे असताना सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत आपल्या संचालक पदाचा गैरवापर करत कंपनीचा विश्वासघात करून राजेंद्र याने त्याचा मुलगा साहिल, उषा प्रॉपर्टीजचे भरत नरसाना, नितेश वडोर, रितेश नरसाना यांच्याशी संगनमत करून लोढा डेव्हलपर्स कंपनीच्या मालकीची अधिकृत जमीन, टीडीआर विविध कंपनींना कमी दरात विक्री केली. तसेच राजाराम पाटील व नीलेश अग्रवाल यांच्या अधिकारात व ताब्यात जमीन नाही हे माहीत असूनदेखील कंपनीस त्यांचा ताबा असल्याचे भासवून त्यांनी रक्कम/फ्लॅट अदा करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मोठा आर्थिक फायदा

राजेंद्र लोढा, साहिल लोढा, भरत नरसाना, नितीन वडोर, रितेश नरसाना यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असून, कंपनीचे कर्मचारी निशा मेनन, नेहा देसाई, अमित कांबळे व विक्रेता सुजितकुमार जीतप्रताप सिंग, विनोद पाटील यांनी वेळोवेळी मदत केली असून नमूद इसमांनी लोढा डेव्हलपर्स लि. कंपनीची फसवणूक करून 85 कोटींचे आर्थिक नुकसान केले आहे असे मुख्य लायझनर मोनिल घाला यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.