मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू; पालकमंत्र्यांच्या हस्ते बीड, लातूर, धाराशीव, हिंगोलीत जातीच्या दाखल्यांचे वितरण

मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप अखेर सुरू झाले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या हस्ते बीड, लातूर, धाराशीव, हिंगोली जिह्यात मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटीयरमधील नोंदी तसेच काही ठिकाणी तर शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या कामाला गती मिळाली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मराठवाड्यात अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले गेले. लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कुणबी नोंदी आढळलेल्या दोन जणांना प्रमाणपत्र देण्यात आले. धाराशीवमध्ये प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

हिंगोलीमध्ये 50 जणांना कुणबी प्रमाणपत्र

हिंगोली जिह्यातील पन्नास मराठा समाजबांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले. शिंदे समितीच्या नोंदीनुसार ही प्रमाणपत्रे देण्यात आली.

नोंदी आधीच शोधून ठेवल्या होत्या का ? – भुजबळ

आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे योग्य आहेत का, त्याच्या नोंदी आधीच शोधून ठेवल्या होत्या का हे पाहावे लागेल. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ म्हणाले, योग्य प्रमाणपत्र चेक करून दिली असतील तर हरकत नाही, पण खोटी माहिती देऊन चुकीच्या मार्गाने दिली असतील तर माझा विरोध आहे, असेही ते म्हणाले.