
जॉली एलएलबी-3 च्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमच्याबाबत (न्यायालय) चिंता करू नका, असे स्पष्ट करत हायकोर्टाने चित्रपटावर स्थगिती आणण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.
जॉली एलएलबी-3 चित्रपटात न्यायाधीश आणि वकिलांची थट्टा केल्याचा आरोप करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी असोसिएशन फॉर एडिंग जस्टीस या संस्थेने हायकोर्टात अॅड. चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर आज बुधवारी सुनावणी घेण्यात आली. चित्रपटातील एका दृश्यात न्यायाधीशांना ‘मामू’ असे संबोधण्यात आले असून न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले, मात्र आम्हाला थट्टेची सवय असून याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची चिंता करू नये, असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.