
आधी खड्डे दर्शन मग पर्यटन अशी अवस्था माथेरानची झाली आहे. लुईझा पॉइंट रोड, रग्बी विभाग आणि मॅलेट स्प्रिंग रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे म्हणण्याची वेळ माथेरानकरांवर आली आहे. येथून मार्ग काढताना पर्यटक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात माथेरानचे निसर्गसौंदर्य काही वेगळेच असते. तेथील हिरवेपणा आणि पाऊसधारा अनुभवण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक माथेरानमध्ये येतात. मात्र लुईझा पॉइंट रोड, रग्बी विभाग आणि मॅलेट स्प्रिंग रोडची पुरती दैन्यवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. खड्ड्यांमुळे पाय घसरून पडणे किंवा पाय मुरगळणे अशा घटना घडल्या आहेत. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील माती वाहून गेली असून फक्त दगड शिल्लक राहिले आहेत.
निकृष्ट कामाची पोलखोल
माथेरान नगर परिषदकडे ३ मार्च रोजी लेखी निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली थुकपट्टी लावली. मात्र मुसळधार पावसाने निकृष्ट कामाची पोलखोल केली. वनखात्याच्या आडकाठीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती शक्य नसली तरी निदान किरकोळ कामे करून रस्ते चालण्यायोग्य करावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
नगर परिषदेने घाईघाईत बांधलेले प्लास्टिक गोण्यांचे बंधारेसुद्धा पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत. तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून चालताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती करण्यात यावी ही आमची मागणी आहे. मात्र दुर्दैवाने तीही पूर्ण होत नाही.
– नंदकिशोर सनगरे, स्थानिक