
जगभरातील तेल आणि वायूचे भांडार जलदगतीने कमी होत आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (आयईए) इशारा दिला आहे. तेल, वायूच्या आयातीवर अवलंबून असणाऱ्या हिंदुस्थानला हा मोठा धोका असेल. हिंदुस्थानने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करावी, विविध स्रोत, घरगुती व स्वच्छ ऊर्जा पर्यायांवर अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आयईएच्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालासाठी आयईएने जगभरातील 15 हजार तेल आणि वायू क्षेत्रातील डेटाचे विश्लेषण केले.
हिंदुस्थान आपल्या गरजेनुसार 85 टक्के कच्चे तेल आणि 45 टक्के वायू आयात करतो. मात्र जागतिक स्तरावर तेल, वायूचा साठा कमी होत असल्याने येत्या काळात पुरवठय़ात अडथळे येऊ शकतात किंवा किमतीत वाढ होऊ शकते.
हिंदुस्थानने काय करावे?
- आयईएच्या अहवालानुसार, तेल व वायूच्या आयातीसाठी एकाच देशावर अवलंबून राहणे कमी करावे.
- मायदेशात तेल आणि वायूच्या शोधाला गती द्या.
- आपत्कालीन स्थितीत तेल आणि गॅसचे भांडार वाढवा.
- ग्रीन हायड्रोजन, बायोफ्यूल, अन्य नवीनतम ऊर्जा स्रोतावर जोर दिला पाहिजे, जेणेकरून आयातीवरचा भार कमी होईल.
नव्या प्रकल्पांसाठी 20 वर्षे
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने इशारा दिला आहे की, तेल आणि गॅस प्रकल्प विकसित करण्यासाठी साधारण 20 वर्षे लागतात. स्रोतांच्या शोधासाठी 10 वर्षे आणि त्यानंतर मूल्यांकन, मंजुरी आणि निर्मितीसाठी आणखी 10 वर्षे लागतील. यामधील गुंतवणुकीत किंवा शोध प्रक्रियेत विलंब झाला तर 2030 आणि 2040 च्या दशकात तेल, वायूचा पुरवठा कमी होऊ शकतो. परिणामी ऊर्जा, सुरक्षा, किमतीमध्ये अस्थिरता आणि उत्सर्जनावर परिणाम होईल.
का संपुष्टात येतोय साठा?
तेल आणि वायू क्षेत्रातून उत्पादन नैसर्गिकरीत्या कमी होत आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे खडक आणि खोल समुद्रातील स्रोतांवर तेल व गॅस उद्योग अवलंबून आहे. हे स्रोत जमिनी स्रोतांच्या तुलनेत लवकर संपुष्टात येतात. नैसर्गिक साठे टिकवून ठेवण्यासाठी तेल आणि वायू उद्योगाला वर्षाला 90 टक्के खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नवी मागणी पूर्ण करण्यासाठी खूप कमी बजेट उरत आहेत. जर या क्षेत्रात नवी गुंतवणूक झाली नाही, तर जागतिक स्तरावर तेलाच्या उत्पादनात दरवर्षी 55 लाख बॅरल प्रतिदिन घट होईल. 2010 साली तेलाचे उत्पादन 40 लाख बॅरल प्रतिदिन पेक्षा जास्त होते. याच प्रकारे नैसर्गिक वायूचे उत्पादन दरवर्षी 270 अब्ज घनमीटर कमी होईल. जे 2010 मध्ये 180 अब्ज घनमीटर होते.