
पती-पत्नीमध्ये उद्भवणाऱ्या वैवाहिक वादांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने पतीला त्याच्या कुटुंबियांसोबतचे संबंध तोडण्यास भाग पाडणे ही एक प्रकारची क्रूरताच आहे. किंबहुना, हा एक घटस्फोटाचा आधार आहे, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत एका महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने महिलेला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
सासू-सासरे व इतर नातेवाईकांसोबत खटके उडाल्यानंतर महिलेने पतीला त्याच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत संबंध तोडण्यास सांगितले होते. ते पतीला मान्य नव्हते. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली. पत्नीने पतीचा वारंवार सार्वजनिक अपमान आणि शाब्दिक शिवीगाळ करणे ही मानसिक क्रूरता आहे, असे न्यायालयाने म्हटले. वेगळे राहण्याची केवळ इच्छा असणे ही क्रूरता नसली तरी पतीचे त्याच्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्यासाठी सतत दबाव आणणारे वर्तन निश्चितच क्रूरता अर्थात छळ आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे यापूर्वी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. पत्नीने पतीला त्याच्या पालकांपासून दूर करण्याचा सतत प्रयत्न करणे ही मानसिक क्रूरता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटलेले आहे, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल देताना नमूद केले.
या प्रकरणातील पत्नीला संयुक्त कुटुंबात राहायचे नव्हते. त्यामुळे ती कुटुंबाची मालमत्ता विभागून घेण्याबाबत तसेच विधवा आई व घटस्फोटित बहिणीपासून वेगळे राहण्याबाबत पतीवर दबाव टाकत होती. पत्नीची ही कृत्ये पतीचा छळ असून याआधारे पिडीत पतीला घटस्फोट मिळवता येतो, असे न्यायालयाने म्हटले. पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वारंवार धमक्या देणे, पोलीस तक्रारी दाखल करणे हीदेखील क्रूरता आहे. या कृत्यांना घटस्फोटाचा आधार मानले जाते, असेही न्यायालयाने नमूद केले आणि महिलेच्या कृत्यांचा विचार करुन तिचे अपील फेटाळले.