
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबई, ठाण्यात ताकद आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून जसे एकत्र लढतो तसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच एकत्र लढणे शक्य नाही. प्रत्येकाची बलस्थाने पाहून त्या त्या वेळी निर्णय घ्यावे लागतील, असे पवार यांनी सांगितले.
सामाजिक कटुता कशी कमी होईल?
हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवत आहे. या गॅझेटची कॉपी मला मिळाली आहे. राज्यात सामंजस्य राहावे, एकीची वीण कायम राहावी हे सगळ्यांनाच वाटते. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावांत कटुता निर्माण झाली आहे. हे घातक आहे, असे पवार यांनी सांगितले. विखेंच्या समितीत सगळ्या जातीचे सदस्य आहेत. पण बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात महाराष्ट्रातील काही जिह्यांत एकमेकांच्या व्यवसायाकडे न जाण्याची कटुता दिसत आहे. हे चित्र यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हते. त्यामुळे ही सामाजिक कटुता कशी कमी होईल, असा सवाल शरद पवार यांनी केला.
मोदींना अवतार पुरुष का म्हटले हे मला समजले नाही
मोदींना अवतार पुरुष का म्हटले हे मला समजले नाही. 75व्या वर्षी मी राजकारणात थांबलो नाही. त्यामुळे मोदींनी थांबावं असे मला म्हणता येणार नाही, अशी मिश्कील टिप्पणीही शरद पवार यांनी केली. पंच्याहत्तरीनंतर थांबले पाहिजे, असे बोललोच नव्हतो, असं काही लोक आता म्हणत आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.