म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी मार्चला, सर्वसामान्यांचे गृहस्वप्न लांबणीवर

म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीकडे आतुरतेने डोळे लावून बसलेल्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळीत म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी येणार असल्याचे या वर्षाच्या सुरुवातीला म्हाडाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता दिवाळीऐवजी मार्चमध्ये मुंबईतील घरांची लॉटरी येणार आहे.

म्हाडाच्या संकेतस्थळावरील ‘म्हाडासाथी’ या एआय चॅटबॉटचे लोकार्पण गुरुवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुंबईतील घरांच्या लॉटरीबाबत संजीव जयस्वाल म्हणाले, ‘म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला. या लॉटरीसाठी सुमारे 1 लाख 80 हजार अर्ज आले तर दीड लाखांहून अधिक जणांनी अनामत रक्कम भरली. आता याच वित्तीय वर्षात मुंबईतील घरांची लॉटरी काढण्याचे आमचे नियोजन आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी म्हाडाचे अनेक प्रकल्प सुरू झाले नव्हते. आता आमची अडचण दूर झाली आहे. म्हाडाचे स्वतःचे प्रकल्प असो किंवा 33(5) द्वारे किती घरे उपलब्ध होऊ शकतील याचा अंदाज घेऊन मुंबईतील घरांसाठी आम्ही लॉटरी जाहीर करू. पुढील काही वर्षांत समूह पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा म्हाडाला उपलब्ध होईल’, असेही जयस्वाल म्हणाले.

नागरिकांना चुटकीसरशी मिळणार माहिती

‘म्हाडासाथी’ या चॅटबॉटद्वारे म्हाडाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांशी संबंधित माहिती नागरिकांना चुटकीसरशी मिळणार आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करायचा, आपल्या अर्जाची सद्यस्थिती काय, मास्टर लिस्टसाठी अर्ज कसा करायचा, अशा म्हाडाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे याद्वारे मिळणार आहेत. सध्या हा चॅटबॉट मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात दिवाळीपर्यंत ही सेवा मोबाईल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

घरबसल्या नागरिकांची कामे होणार

म्हाडा मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रातील नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी 15 मिनिटांवरून आता 7 ते 8 मिनिटांवर आणला आहे. दस्तावेज अथवा टपाल स्पॅनिगसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी नागरिक आपले डॉक्युमेंट स्पॅन करवून यापुढे या केंद्रावर सादर करू शकतील. यापुढे नागरिकांना घरी बसूनच डॉक्युमेंट पाठवता येतील यादृष्टीने प्रणाली अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीदेखील जयस्वाल यांनी दिली.