कलिना कॅम्पसमधील सर्व जीर्ण इमारतींची डागडुजी करा, युवासेनेची विद्यापीठाकडे आग्रही मागणी

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कलिना कॅम्पसमधील सर्व जीर्ण इमारतींची वेळीच डागडुजी करावी अथवा इमारतींचे नव्याने बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, अशी आग्रही मागणी युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे. यासंदर्भात कुलुगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी यांना पत्र लिहिण्यात आले आहे.

कलिना येथील मुंबई विद्यापीठ, गरवारे इन्स्टिट्यूट येथे शिक्षण घेणाऱ्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जीर्ण इमारतींच्या प्रश्नाकडे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारींची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी गरवारे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. नायक यांच्यासोबत जीर्ण इमारतींची पाहणी केली.

महिनाभरापूर्वी गरवारे इन्स्टिट्यूट येथील काही वर्गांमध्ये छत कोसळले. सुदैवाने त्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्या बंद वर्गांमुळे दोन ते तीन सत्रांत नियमित विद्यार्थ्यांच्या तासिका घेण्यात येत आहेत. महिनाभरानंतरही ते वर्ग सुरू केले नसल्याचे युवासेना सिनेट सदस्यांच्या पाहणीत आढळले. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्य दाखवावे आणि एमएमआरडीएकडून विकासकामासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जागेचा मोबदला म्हणून सरकारकडून 1200 कोटी रुपये मिळवावेत, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली आहे. त्या निधीतून विद्यापीठाचा विकास करण्याचेही कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात सुचित केले आहे.

सरकार मोठ्या अपघाताची वाट पाहतेय का?

कलिना कॅम्पसमधील अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या इमारती कोसळून मोठा अपघात घडण्याची वाट सरकार पाहतेय का, असा सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे. सर्व जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी पत्रातून केली आहे.