
मराठा आरक्षणासंदर्भातील हैदराबाद गॅझेटीयरच्या शासन निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. त्यामुळे एकतर हा जीआर मागे घ्या, नाहीतर त्यामध्ये सुधारणा करा, अशी मागणी करत ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला केला.
राज्यात हैदराबाद गॅझेटीयर लागू करून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आम्ही आतापर्यंत चार ते पाच रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. एक कुणबी सेनेच्या वतीने, नाभिक समाजाच्या वतीने, माळी महासंघाच्या वतीने, समता परिषदेच्या वतीने अशा वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्याची सुनावणी लवकरच सुरू होईल, असे भुजबळ म्हणाले.
अतिशय काळजीपूर्वक आपण या प्रकरणाच्या संदर्भात वकील नेमले आहेत. मला खात्री आहे की, आपली मागणी आहे की एकतर हा जीआर मागे घ्या, नाहीतर त्या जीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करा. यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.