Samir Modi – पळपुट्या ललित मोदीच्या भावाला दिल्ली विमानतळावरून अटक, नेमकं प्रकरण काय?

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) माजी अध्यक्ष आणि घोटाळेबाज फरार व्यावसायिक ललित मोदी यांचा भाऊ समीर मोदी याला गुरुवारी सायंकाळी दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली. समीर मोदीवर एका महिलेने बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि धोका दिल्याचा आरोप केला आहे. 2019 मधील हे प्रकरण आहे.

पीडित महिलेने 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील न्यू फ्रेंडस कॉलनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी समीर विरोधात कलम 376 (बलात्कार) आणि 506 (धोका देणे) अन्वये गुन्हा दाखल करत लुकआऊट सर्कुलर जारी केले होते. गुरुवारी सायंकाळी युरोप दौऱ्यावरून येताच पोलिसांनी समीरला दिल्ली विमानतळावरच बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलीस काय म्हणाले?

फॅशन आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीमध्ये करियर घडवण्याच्या बहाण्याने 2019 मध्ये पीडित महिलेशी संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये समीरने महिलेला न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध ठेवले. मारहाण आणि ब्लॅकमेलिंगही केले. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप पीडितेने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोप खोटे, पोलिसांची मनमानी कारवाई

दरम्यान, या प्रकरणी समीर मोदीच्या वकिलांनीही निवेदन जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. समीर मोदी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. एफआयआर खोट्या आणि बनावत तथ्यांवर आधारित असून समीरकडून पैसे उकळण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आल्याचा दावा, अॅड. सिमरन सिंह यांनी केला. 

8 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी समीर मोदी सदर महिलेविरोधात खंडणी आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली होती. व्हॉट्सअपच्या चॅटच्या माध्यमातून महिलेने 50 कोटींची मागणी केली होती, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तसेच पोलिसांनी तथ्यांची पडताळणी न करता घाईघाईने अटकेची कारवाई केली. समीर मोदी हिंदुस्थानात परत आल्यानंतर त्यांना मनमानीपणे अटक करण्यात आली, असेही यात नमूद करण्यात आलेले आहे.