महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ‘तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड आहे’, असे वादग्रस्त विधान केले. यामुळे पडळकर यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार ? असा परखड सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

अमोल कोल्हे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis, विचार करा… आपण केवळ एका पक्षाचे नाहीत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार ? महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय ! यापोस्टसोबत त्यांनी एक पत्रकही शेअर केले आहे.

या पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, जय शिवराय। माकडाच्या हाती कोलीत दिले आणि ते बोंबलत आग लावत सुटले तर दोष माकडापेक्षा कोलीत देणाऱ्याचा जास्त असतो, असे म्हणतात.. सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात दिवसागणिक आपल्या वक्तव्यांनी नीचतम पातळी गाठण्याची अहमहिका काही वाचाळवीरांमध्ये लागलेली दिसून येते.. दुर्दैवाने सत्तेच्या वळचणीला असू तर काहीही खपू शकते हा समज दृढ झाला तर येणारा भविष्यकाळ कधीही माफ करणार नाही..राज्याचे प्रमुख या नात्याने आणि एक सुसंस्कृत राजकीय व्यक्ती म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहेत… त्या धुळीस मिळू नयेत ही देखील अपेक्षा… या वाचाळवीरांच्या बेताल बडबडी ऐकून एका प्रसिध्द नाटकातील संवाद आठवतो – “तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती?” या धर्तीवर या वाचाळवीरांना सांगावेसे वाटते – “आपली पात्रता काय.. आपण बोलतोय काय?” असे या पत्रकात म्हटले आहे.