
राज्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण 3 लाख 41 हजार 973 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. यासाठी ‘बार्टी’कडून ऑनलाईन पोर्टल पूर्णपणे ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.
‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे म्हणाले की, या प्रक्रियेला अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, इमाव व विमाप्र (जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 व नियम 2012 अंतर्गत अर्जदारांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. समित्या आवश्यक कागदपत्रांची छाननी करून त्रुटी असल्यास मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे.